पुण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात लवकरच बैठक   

माधुरी मिसाळ यांची माहिती

मुंबई : पुणे शहराला होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसंदर्भात येत्या काही दिवसांत बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी दिले.
 
आमदार योगेश टिळेकर यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी विचारली होती. यावेळी टिळेकर म्हणाले, राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठी पुणे महापालिका आहे. शहरातील अनेक भागांना अपुरा पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे २६०० कोटी  खर्च करुन समान पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. २०१८ मध्ये सुरु झालेल्या या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महापालिका प्रशासन वर्षअखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे सांगत आहे. अद्याप काही टाक्यांचे बांधकाम होणे आहे. यासाठी वन आणि संरक्षण विभागाची जागा आवश्यक आहे. राज्य सरकारने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी केली.याबाबत राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, मी सुध्दा पुण्याची आहे. या योजनेबाबत अधिवेशन काळातच बैठक बोलवण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्यात येतील.
 

Related Articles